चंद्रपूर:- येथील दोन दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागली व त्या आगीत लाखो रुपयांचा माल स्वाहा झाल्याची घटना दि ६ डिसेंबर ला घडली.
जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू आहे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अशातच 6 डिसेंबरच्या मध्यरात्री आशा ड्रायफ्रूट व आशा होम शॉपी ला लागलेल्या आगीत अंदाजे 40 ते 45 लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
चंद्रपूर येथील मुख्य मार्गावर धनराज प्लाझाच्या खाली महेंद्र मंडलेचा ह्यांच्या मालकीचे आशा ड्राय फूड, व आशा होम शॉपी नावाचे दुकान आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे मंडलेचा आपले दुकान बंद करून निवस्थानी गेले. मात्र सकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती भ्रमणध्वनी वरून मिळाली असता त्यांनी लगेच दुकानाकडे धाव घेतली.
दुकानाच्या जवळच असलेल्या एका आस्थापनेच्या चौकीदाराला सकाळी आग लागल्याचे लक्षात येताच त्याने सर्वप्रथम मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली व लगेच दुकान मालकाला कळविले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे सब ऑफिसर विकास शहाकर, जितु वाकडे, फायरमन मोहुर्ल, सुदीप, वैभव ह्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविणे सुरू केले, दरम्यान तेव्हापासूनच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निंभोरकर व हवालदार निलेश ढोक ह्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली
यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता सदर आग मध्यरात्री 1:30 ते 2:00 वाजताच्या दरम्यान लागली असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असुन शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.