Ø चंद्रपूर फ्लाईंग क्लब निर्मिती साठी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश
Ø मंत्रालयात अधिकाऱ्यांसह घेतली आढावा बैठक
मुंबई / चंद्रपूर, दि. 8: चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाईंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती - जमाती, इतर मागासवर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाईंग क्लब लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
मंत्रालयात ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, जिल्हाधिकारी विनय गौडा, हरीश शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, दूरदृष्य प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, एमएआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे उपस्थित होत्या.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात फ्लाईंग क्लब झाल्याने येथील वैमानिक बनू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व रीतसर परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपती कडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चंद्रपूर विमानतळाचा वापर सध्या बंद आहे. त्यामुळे येथे फ्लाइंग क्लब सुरू केल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियमानुसार जे २०० तासांचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते, ते येथे देता येईल. विमानतळावरील सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता विमानतळ प्राधिकरणाने कराव्यात. यासाठीचा सेवा रस्ता आणि इतर अनुषंगिक कामे राज्य शासन करेल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.