बल्लारपूर : दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या युवकाचा रेल्वे च्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील विसापुर येथे घडली.
विसापुर येथील इंदिरानगर वॉर्ड मधील युवक श्रीकृष्ण ऋषी शेडमाके वय २५ वर्ष याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. त्याच्या निधनामुळे अवघ्या दोन महिन्यांतच त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. श्रीकृष्ण शेडमाके हा नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून फिरण्यासाठी करण्यासाठी घरून निघाला होता. त्यानंतर घराजवळ असलेल्या रेल्वे रुळावर तो बसला. या रुळावरून मेमू रेल्वे गाडी चालते. तिची वेळ दुपारी ४ वाजताची आहे. मात्र, रविवारी ही गाडी रात्री १० वाजताच्या दरम्यान आली. अचानक आलेल्या रेल्वेमुळे त्याची धांदल झाली. गाडी दिसताच तो उठला मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले. रात्र होऊनही तो घरी परत आला नसल्याने कुटुंबीयांनी चौकशी केली असता तो रेल्वे रूळ परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. श्रीकृष्णचे १० मे रोजीच लग्न झाले होते.