वडसा (देसाईगंज) : तालुक्यातील कुरुड-कोंढाळाच्या नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर वडसा (देसाईगंज) महसूल विभागाने 6 जूनच्या मध्यरात्री कारवाई केली आहे. या कारवाईत दोन हायवा ट्रक जप्त करण्यात आल्याने रेतीमाफियांचे धाबे दणाण्ले आहेत.
वैनगंगा नदी ही गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या मधोमध वाहते. दोन्ही जिल्ह्यातील रेतीमाफिया सीमा हद्दीचा गैरफायदा घेत राजरोसपणे हजारो ब्रास रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन शासनाचा कोट्यावधीचा महसूल गिळंकृत करीत आहेत. वडसा (देसाईगंज) येथे नव्यानेच रुजु झालेले नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांच्या निदर्शनात ही बाब लक्षात येताच त्यांनी 6 जुनच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास मंडळ अधिकारी खुशाल कावळे, तलाठी वनकर, उसेंडी, नाकतोडे व कोतवाल हिरा निमजे तसेच इतर सहकारी आणि वडसा (देसाईगंज) पोलिस स्टेशनचे तीन कर्मचारी घेवुन कुरुड-कोंढाळा नदीपात्रालगत धडाकेबाज कारवाई करीत दोन हायवा ट्रक जप्त केले.
विशेष म्हणजे, महसूल विभागाचे पथक ब्रम्हपुरी तालुक्यातील बोळेगांव नदी घाटाजवळ पोहचताच त्याठिकाणी जवळपास 50 हायवा ट्रक उभे होते. तर 100 पेक्षा अधिक मनुष्यबळ उपस्थित होते. मात्र रात्रीच्यावेळी नेमकी हद्द वडसा (देसाईगंज) तालुक्याची की ब्रम्हपुरी तालुक्याची हा प्रश्न निर्माण झाल्याने जवळपास रात्री 1 वाजेपर्यंत पथकाने प्रतीक्षा केली. दरम्यान, हायवा ट्रक हे वडसा (देसाईगंज) तालुक्यातील कुरुड-कोंढाळा नदीच्या सीमेत येत असल्याचे निष्पन्न होताच नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांनी ट्रक जप्तीची कारवाई सुरु केली. मात्र माफियांचे मनुष्यबळ 100 पेक्षा जास्त असल्याने बरेच चालक ट्रक घेवुन पळु लागले. कारवाईदरम्यान, ट्रक क्रमांक एमएच 36 एए 5057 चा वाहक नंदु विस्तारी पसे व एमएच 36 एए 2511 चा वाहक विनोद रामरतन बावणे यांच्याकडुन 50 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.