राजुरा:- उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील शौचालयामध्ये दोन ते अडीच महिन्याचे मृत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना हे अर्भक शौचालयाच्या कमोडमध्ये आढळलं आहे. उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील एका शौचालयाच्या सीट मधून पाण्याचा निचरा होत नव्हता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सफाई कामगारांना त्याच्या दुरुस्तीसाठी. सफाई कामगाराने सीट मधून पाणी जात नसल्याने लोखंडी सळी टाकून बघितले असता त्या सळईला लागून अंदाजे दोन ते अडीच महिन्याचे नाळ न कापलेले पुरुष जातीचे अर्भक बाहेर आले.
ही माहिती सफाई कामगार यांनी लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती राजुरा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी मृत अर्भकाचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतलेत. रुग्णालयात ही घटना घडली असताना कुणालाच याची माहिती झाली नसल्याने रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.
रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असताना अर्भक आले कुठून? ते अर्भक शौचालयाच्या कमोडमध्ये टाकून कोण गेलं, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. राजुरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.