आरमोरी: प्रियकर प्रेयसीला भेटायला गेलं पण परत आलाच नाही, अन् एक आठवड्यानंतर... | BatmiExpress™

Armori,Armori Live,Armori News,Armori Crime,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Crime,

Armori,Armori Live,Armori News,Armori Crime,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Crime,

आरमोरी
:- तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचा चक्क मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. एक आठवड्यानंतर तलावात मृतदेह आढळल्याने पोलिसांसमोर गुन्ह्याचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान होतं. तब्बल २३ दिवसानंतर या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरमोरी तालुक्यातील पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील कुलकुली गावातील तलावात २३ जुलै २०२२ ला एक मृतदेह तरंगताना आढळला. पोलीस मदत केंद्रात या घटनेची नोंद करण्यात आली. हा मृतदेह समीर आहा (२२ वर्षे रा. कोसरी, पोस्ट-मानापूर, ता-आरमोरी) याचा असल्याचे निष्पन्न झाले. घटना संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास करायला सुरुवात केली. मात्र, 28 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत नक्षल सप्ताह सुरू असल्याने पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यास वेळ लागला. अखेर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नुकताच या घटनेचा उलगडा करण्यात आला आहे. प्रेयसीचे वडील आणि इतर दोघांनी समीरची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

समीर हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी १६ जुलैला रात्री ९ वाजेच्यादरम्यान कुलकुली येथे गेला होता. प्रेयसीच्या बहिणीने त्याला बघताच आरडाओरड सुरू केली. एवढ्यात समीरच्या प्रेयसीचे वडील, तिच्या काकांसह आणखी एक जण अशा तिघांनी यावेळी समीरला जबर मारहाण केली. लथाबुक्क्या आणि काठीने जबर मारहाण केल्याने समीर बेशुद्ध झाला. त्यांनी समीरला त्याच्याच दुचाकीवरून नेले आणि गावाबाहेर रस्त्याच्या बाजूला फेकून दिले. समीरची त्याची दुचाकी रस्त्यावर टाकून दिली. मात्र, थोड्या वेळाने समीर शुद्धीवर आल्याने तो कुलकुलीच्या दिशेने निघाला. झाडाच्या आडोश्याला लपलेल्या त्या तीन जणांनी समीरला काही अंतरावर पुन्हा गाठले आणि त्याला जवळच असलेल्या तलावात फेकून दिले.

तब्बल एक आठवड्यानंतर म्हणजे २३ जुलैला समीरचा मृतदेह तलावात आढळून आला. पोलिसांना हत्येचा संशय आल्याने त्यांनी नक्षल सप्ताह आटोपल्यावर योग्य चौकशी करून समीरच्या प्रेयसीचे वडील सोगू कोल्हे, मोठे वडील भाकराय कोल्हे आणि एकनाथ उसेंडी या तीन जणांना अटक करून गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा तपास मालेवाडा येथील पोलीस मदत केंद्र उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. बी. राठोड, पो हवालदार दुगा, नापोशी ठाकरे, संतोष हुंद्रा, उमेश जगदाळे, राजू मडावी यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.