गडचिरोली : बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत एका गावात गावातील विवाहित पुरुषाने शेजारीच राहत असलेल्या नात्यातील एक वर्ष दहा महिने वयाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. ही संतापजनक घटना उघडकीस येताच आराेपी फरार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपीची पत्नी गरोदर असून ती माहेरी गेली आहे. अशातच दुपारच्या सुमारास तो पीडित मुलीच्या घरी गेला. त्यावेळी मुलीचे आईवडील घरीच हाेते. मुलीला फिरवून आणतो, खाऊ घेऊन देतो या बहाण्याने तिला दुचाकीने घेऊन गेला. नातेवाईकच असल्याने मुलीच्या आई-वडीलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. काही वेळानंतर सदर कोतवालाने तिला तिच्या घरी आणून सोडले.पण मुलीची अवस्था बघून आईवडिलांना शंका आली. त्यांनी एटापल्ली पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला गडचिरोली येथे हलविण्यात आले. आरोपीविरोधात एटापल्लीत पोलीस ठाण्यात पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.