मध्य भारतापासून तेलंगाणा पर्यंत व बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला मेघराजाने कवेत घेतले आहे. दरम्यान मागील काही दिवसांत विदर्भात पावसाचे प्रमाण वाढले आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता काही तज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे.

निर्धारित पातळी गाठू लागले प्रकल्प

असाच पाऊस सुरू राहिला तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्प आपली निर्धारित लवकरच गाठतील. सद्यस्थितीत लालनाला प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असतांना, लभाणसराड प्रकल्प १०० टक्के, चारगाव ९५ टक्के, नालेश्वर ९० टक्के, असोलामेंढा ७० टक्के, चंदई प्रकल्प ७५ टक्के, डोंगरगाव ९१ टक्के, पकडीगुडम ६५ टक्के तर अमलनाला प्रकल्प ४८ टक्के भरला आहे. इराई धरण ६२ टक्के भरले आहे. हे सर्व प्रकल्प निर्धारित पातळी गाठू लागल्याने सर्व प्रकल्पावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. धरणाला नुकसान होऊ नये म्हणून, असाच संततधार पाऊस सुरू राहिला तर पाटबंधारे विभागाला इराई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागणार आहे. अशास्थितीत चंद्रपूरकरांना पुन्हा एकदा पूरस्थितीचा सामना करावा लागेल.

११ व १२ जुलैला अत्यंत तीव्र मुसळधार पाऊस

प्रादेशिक हवामान खात्याने १० जुलैला प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार चंद्रपूर जिल्ह्यात ११ व १२ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत अत्यंत तीव्र मुसळधार (एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल) पाऊस होण्याची शक्यता वर्तविल्याने नदी काठच्या नागरिकांनी अतिविशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

नागरिकांनी सतर्क रहावे

मागील ४ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टी सारखीच स्थिती सर्वत्र आहे. चौफेर पाऊस असल्याने नदीनाले दुथडी ओसंडून वाहू लागले आहे. यांनी धोक्याची पातळी गाठली तरच पूरस्थिती निर्माण होऊ शकते. वातावरणात होणारे बदल व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्क रहावे. या काळात लोकांनी नदीत उतरू नये, रात्रीच्यावेळी विशेष सतर्क असावे, सुरक्षित ठिकाणी राहावे.

– एस.बी.काळे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपूर.

मेघगर्जनेसह वीज कोसळण्याची शक्यता

कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचे प्रमाण वाढले तर बंगलच्याखाडीमध्ये हीच स्थिती आहे. या बदलामुळे पावसाचे प्रमाण तर वाढतेच पण मेघगर्जनेसह वीज पडण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

– प्रा. सुरेश चोपणे पर्यावरण अभ्यासक, ग्रीन प्लॅनेट सोसायटी चंद्रपूर