मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकर (Loudspeaker Banned In Mumbai) वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. सायलेंट झोनमध्ये (Silent Zone) कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवण्याची परवानगी नसेल. जर कोणीही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याचा अर्थ धार्मिक स्थळ असो किंवा कोणताही खासगी कार्यक्रम असतो, असं केल्यास कारवाई करण्यात येणार.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम ही तयार केली आहे. कंट्रोल रूमला जर कॉल आला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.
याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी आदी कामात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयपीसी कलम १४४, १४९ आणि १५१ इत्यादी अंतर्गत समाजविघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा विचार केला जात आहे. काही लोकांना आधीच यासंबंधित नोटीस बजावण्यात आली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.