मुंबई:- शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवणार आहोत. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, "कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही. त्यामुळे निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील. 15 फेब्रूवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईनच होतील".
सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु:
दरम्यान, राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. "विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याची माहिती आज वर्षा गायकवाड यांनी दिली.