Chandrapur News: कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात किमान एक वॉर्ड तर संपूर्ण जिल्ह्यात किमान 20 टक्के गावांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक कृती दलाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.
संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला शासन आणि प्रशासनाने प्राधान्य दिले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, चंद्रपूर महानगर पालिका तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालिका क्षेत्रात किमान एका वॉर्डात पात्र नागरिकांचे 100 टक्के लसीकरण करण्यावर भर द्या. यासाठी न.प.मुख्याधिका-यांनी नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने वॉर्डनिहाय बैठका घ्याव्यात. ज्यांनी लसीकरण केले आहे, अशा नागरिकांचा प्रभावी वापर करून घ्या. वॉर्डावॉर्डात गठीत झालेल्या कोरोना नियंत्रण समित्यांना सक्रीय करा.
जिल्ह्यात जवळपास 1615 गावे आहेत. तहसीलदार आणि गटविकास अधिका-यांनी आपापल्या तालुक्यातील किमान 20 टक्के गावांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. लस उपलब्धतेबाबत नियमितपणे पोर्टलवर माहिती भरणे आवश्यक आहे. त्यानुसारच जिल्ह्याचा लसींचा साठा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदेशात जाणा-या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र : विदेशात शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे नागरिक तसेच ऑलंपिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू फक्त यांच्याकरीताच जिल्ह्यात विशेष लसीकरण केंद्र डीईआयसी बिल्डींग, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे बुधवार दि. 23 जून 2021 रोजी लावण्यात येणार आहे. यात ज्या नागरिकांचा पहिला डोज असेल त्यांना पहिला तर ज्यांना पहिला डोज घेऊन 28 दिवस पूर्ण झाले असेल त्यांना दुसरा डोज (फक्त कोव्हीशिल्ड लस) देण्यात येईल, असा निर्णय कृती दलाच्या बैठकीत घेण्यात आला.