|
जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण |
Gadchiroli Corona Updates: जिल्हयात सद्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे चांगले कार्य सुरू असून इतर विकास कामेही प्रगथीपथावर आहेत. यावेळी आरोग्य सुविधांसह इतर सर्वच विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकित उपस्थितांना दिले.पालकमंत्री यांनी आज जिल्हयात विविध विषयांचा आढावा बैठकीत घेतला. यामध्ये कोरोना, आरोग्य सुविधा, धान खरेदी व साठवणूक, शेती सलग्न विषय, वीज समस्या व नियोजन मधील कामांची सद्यस्थिती यांचा समावेश होता. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदर कृष्णा गजबे, आमदार डॉ.देवराव होळी, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, नगराध्यक्षा योगिता पिपरे व तालुका तसेच जिल्हा स्तरावरून सर्व विभाग प्रमुख ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते.
$ads={1}
बैठकीआधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे, त्याचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या इतर सुधारणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यापुर्वी नुकतेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा, आयसीयू कक्ष यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तसेच यापुर्वी तालुकास्तरावर सोनाग्राफी सुरू करण्यात आली आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन स्वरूपात विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला व विकास कामांबाबत विभाग प्रमुखांना सूचना केल्या. यावेळी उपस्थित आमदार यांनी आपापल्या क्षेत्रातील विकास कामांचे प्रस्ताव व अडचणी पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी संबंधीत प्रशासनाला दिले.
जिल्हयातील प्रलंबित प्रस्तावांबाबत सचिवांशी साधला संवाद : जिल्हयातील विविध कामांबाबत आढावा घेत असताना आलेल्या अडचणींबाबत पालकमंत्री यांनी राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत विविध विभागाच्या सचिव तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने प्रस्ताव मंजूरीचे निर्देश दिले. यामध्ये कोरची तालुक्यातील नवीन वीज जोडणी, मत्स्य शेती, धान साठवणूक गोदामे व दुरुस्ती या कामांचा प्रामुख्याने समावेश होता.
नगरपालिका प्रशासनाचा आढावा घेत असताना 25 कोटी रूपये वितरीत केले होते त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच सद्यस्थितीत चालु कामांचे तपशिल जाणून घेतले. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हयातील प्रमुख शहरात ऑडोटोरीयम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरीयम जिल्हयात उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 105 कोटी रूपये लागणार आहेत. सदर प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू असल्यासचे त्यांनी यावेळी सांगितले.
$ads={2}
कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे केले आवाहन : कोरोना बाबत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेत असताना त्यांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज असून संसर्ग रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. संपुर्ण राज्यात कोरोना रूग्ण वाढत आहेत. गडचिरोली जिल्हयातही वाढ निदर्शनास येत आहे. आता पुन्हा सर्व शासकिय यंत्रणांनी मागील कालावधीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.